Thursday, November 27, 2025
Latest:
महाराष्ट्र

यंत्रमाग उद्योगाच्या समस्यांबाबत आ. विजयकुमार देशमुख यांनी विधानसभेत वेधले सरकारचे लक्ष

Spread the love

यंत्रमाग उद्योगाच्या समस्यांबाबत आ. विजयकुमार देशमुख यांनी विधानसभेत वेधले सरकारचे लक्ष

कुंभारी येथे नवीन औद्योगीक वसाहतीची उभारणी करावी
: आ. विजयकुमार देशमुख यांची मागणी

सोलापूर : प्रतिनिधी

हजारो कामगारांची उपजीविका अवलंबून असलेल्या यंत्रमाग उद्योगाच्या समस्यांबाबत माजी पालकमंत्री आ. विजयकुमार देशमुख यांनी गुरुवारी विधानसभेत सरकारचे लक्ष वेधले. यंत्रमाग उद्योगाच्या समस्या सोडविण्याची मागणी त्यांनी याप्रसंगी सरकारकडे केली.

चीनवरून आयात होणाऱ्या मायक्रो टॉवेलमुळे सोलापुरातील टेरिटॉवेलची मागणी कमी होत आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून धोरण आखणे आवश्यक आहे. देशात लागू करण्यात आलेल्या एम.एस.एम.ई. कायद्यामुळे व्यापाऱ्यांना उधारमाल विकण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे या कायद्याचा पुनर्रभ्यास करण्यासाठी समिती नेमून कायद्यात दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनास पाठवण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली.

सोलापुरात नवीन वस्त्रोद्योग धोरणातंर्गत मिनी टेक्सटाईल पार्क मंजूर करावे. अक्कलकोट रस्ता आणि चिंचोळी या दोन्ही औद्योगिक वसाहतींमध्ये नवीन उद्योग उभारणीसाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही. यावर उपाय म्हणून कुंभारी येथे नवीन औद्योगिक वसाहतीची उभारणी केल्यास मोठ्या उद्योगधंद्यांना जागा, पर्यायाने सोलापूरकरांना रोजगार उपलब्ध होऊ शकेल. सोलापुरात यंत्रमाग उद्योग असल्यामुळे ‘डी प्लस’ चा दर्जा मिळावा, सोलापुरात अत्याधुनिक अग्निशामक केंद्राची उभारणी करावी, राज्य शासनाने घोषित केलेल्या ‘ टफ ‘ योजनेची अंमलबजावणी व्हावी, सौरऊर्जा प्रकल्प उभारणीचा पर्याय यंत्रमागधारकांना ऐच्छिक असावा, तसेच ज्यांना सौरऊर्जा प्रकल्प उभारावायचा आहे त्यांना शासनाकडून ५० टक्के अनुदान मिळावे, वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी पाणीपुरवठा, अंतर्गत रस्ते, ड्रेनेज व्यवस्था, सुरळीत वीजपुरवठा, पायाभूत सुविधा मेळाव्यात अशा मागण्याही माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी अधिवेशनावेळी विधानसभेत सरकारकडे केल्या.

चौकट

यंत्रमागधारकांना दिलासा मिळवून देणार : आ. विजयकुमार देशमुख यांची ग्वाही

सोलापुरातील हजारो कामगारांचे जीवन प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे यंत्रमाग उद्योगावर अवलंबून आहे. सोलापुरातील यंत्रमागधारकांच्या समस्या सोडवून त्यांना निश्चितपणे दिलासा मिळवून देणार आहे, अशी ग्वाही माजी पालकमंत्री आ. विजयकुमार देशमुख यांनी याप्रसंगी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *