माथाडी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांवर खासदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत कामगार आयुक्तांसोबत संयुक्त बैठक; ठोस निर्णयांची दिशा
🛑 माथाडी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांवर खासदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत कामगार आयुक्तांसोबत संयुक्त बैठक; ठोस निर्णयांची दिशा
👉 नोंदणी, पगार भरणा, परवाना नूतनीकरण, लेव्ही वाढ, घरकुल व आरोग्य सुविधा यासह महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा
सोलापूर : दि. १५ सप्टेंबर २०२५) रोजी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय, दमानी नगर येथे खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत माथाडी कामगारांच्या प्रलंबित मागण्या व अडचणींवर महत्त्वपूर्ण संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीस सहाय्यक कामगार आयुक्त तथा जिल्हा माथाडी व असुरक्षित कामगार मंडळाचे आयुक्त निलेश येलगुंडे, उपनिबंधक सहकारी संस्था (AR) सौ. बागल, बाजार समितीचे सचिव अतुलसिंह रजपूत, अधिकारी-कर्मचारी, माथाडी बोर्ड निरीक्षक यांच्यासह मोठ्या संख्येने संघटनेचे पदाधिकारी व कामगार प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीत पुढील महत्त्वपूर्ण मागण्या व निर्णय घेण्यात आले :
📌 अडते व व्यापारी नोंदीत करण्याबाबत: अजूनही माथाडी बोर्डाशी नोंदीत नसलेल्या अडत व्यापारी व खरेदी-विक्री व्यापाऱ्यांना सक्तीने नोंदीत करावे, अशी कामगारांची मागणी खासदार शिंदे यांनी मान्य करून तत्काळ अंमलबजावणीचे निर्देश दिले.
📌 पगार भरणा शिस्तबद्ध करण्याबाबत: अनेक अडते वेळेत पगार भरणा करीत नसल्याचे निदर्शनास आणल्यावर खासदार शिंदे यांनी यावर प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर कामगार आयुक्तांनी बाजार समिती सचिवांना नियमाप्रमाणे भरणा करण्याचे आदेश दिले.
📌 परवाना नूतनीकरण नियमावली: वार्षिक लायसन्स नूतनीकरण करताना हमाली पगार पत्रकाची झेरॉक्स प्रत व माथाडी बोर्डाची NOC अनिवार्य करावी, अशी सूचना संघटनेने केली. यास कामगार आयुक्तांनी मान्यता देत बाजार समितीला आवश्यक ती पावले उचलण्याचे निर्देश दिले.
📌 लेव्ही वाढविण्याची मागणी: लेव्ही रक्कम ३०% वरून ३५% करण्याची मागणी करण्यात आली असून, कामगार आयुक्तांनी हा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचे आश्वासन दिले.
📌 नवीन कामगार नोंदणीतील अट रद्द: ‘नॉन क्रिमिनल NOC’ ची अट रद्द करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
📌 घरकुल योजना व आरोग्य सुविधा: माथाडी कामगारांना रमाई आवास व पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी बाजार समितीकडील जागा उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा झाली. खासदार शिंदे यांनी बाजार समिती सभापतींशी याबाबत चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. तसेच बाजार समिती आवारात माथाडी कामगार व शेतकऱ्यांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्याची मागणीही पुढे आली.
या बैठकीत घेतलेल्या निर्णयांमुळे माथाडी कामगारांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्यांच्या सोडवणुकीला दिशा मिळाली असून, आगामी काळात ठोस अंमलबजावणी होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
बैठकीस अध्यक्ष भीमा सीताफळे, सचिव किरण मस्के (मातोश्री रमाबाई आंबेडकर माथाडी कामगार संघटना), जिल्हा काँग्रेसचे समन्वयक मनोज यलगुलवार, कामगार प्रतिनिधी गफार चांदा, माजी संचालक शिवानंद पुजारी, जेष्ठ कामगार नागनाथ खंडागळे यांच्यासह राजू दणाने, विशाल मस्के, संदीप कांबळे, शिवलिंग शिवपुरे, इरफान पिरजादे, करण राठोड, शिवा जमादार, चंद्रशेखर माळगे आदी उपस्थित होते.
▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬