सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना भाळवणी भाडे तत्वावर चालविण्यास देणेबाबत पत्रकार परिषद
सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना भाळवणी भाडे तत्वावर चालविण्यास देणेबाबत पत्रकार परिषद दिनांक : २३/०८/२०२५ * प्रेसनोट *
सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना लि. भाळवणी हा कारखाना भाडेतत्त्वावर चालवण्यासाठी चेअरमन साहेब यांनी दिलेला आहे ही चर्चा गेल्या महिन्याभरापासून सभासद, कामगार, शेतकरी, संचालक मंडळ व सर्व माध्यमांमधूनच आहे. परंतु याबद्दलची प्रत्यक्ष काय कारवाई झाली किंवा नाही हा संभ्रम सर्व सभासदांमध्ये आहे तो दूर करणं गरजेचं आहे म्हणून या पत्रकार परिषदेचे नियोजन केलेले आहे.
१) सहकार शिरोमणी कारखाना हा खरोखरच भाडेतत्त्वावर देण्यासंदर्भात काही तोंडी बोलणे किंवा कागदोपत्री प्रक्रिया राबवली गेली आहे काय? या गोष्टीचा खुलासा कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी करावा ?
२) सभासदांनी कारखाना चालवण्यासाठी त्यांना जबाबदारी दिलेली आहे परंतु त्या सभासदांना अंधारात ठेवून कारखाना कुठल्यातरी खाजगी उद्योजकाच्या घशात घालण्याचं कारस्थान सभासदांच्या अप्रत्यक्षपणे सुरू असेल तर त्याबाबतची माहिती सभासदांना देणं गरजेचं आहे.
३) सभासद हा या संस्थेचा मालक आहे. आपल्याला कारखाना चालवण्यासाठी विश्वस्त म्हणून जबाबदारी दिलेली आहे. याचा अर्थ कारखाना विकण्यासाठी किंवा कारखाना दुसऱ्याला चालवण्यासाठी म्हणून आपली नेमणूक झालेली नाही. याबाबत निश्चित माहिती कळायला सोय नाही. पण गेल्या महिन्याभरापासून जोरदार चर्चा आहे व गेल्या चार आठ दिवसापासून तर १०० टक्के हा कारखाना एका खाजगी उद्योजकास चालवण्यासाठी दिला आहे अशा बाबतची माहिती कळत आहे. तर हा संभ्रम दूर व्हावा. त्याबद्दल खुलासा करण्याची संपूर्ण जबाबदारी ही चेअरमन म्हणून कल्याणराव काळे त्यांची आहे.
४) संचालक मंडळ, अधिकारी यांच्याशी चर्चा केली असता त्यांनादेखील याबाबत काही माहिती नसल्याचे सांगत आहेत. मग जर कारखाना चालवण्यासाठी भाडे तत्वावर तुम्हाला द्यायचा असेल तर त्यासाठी संचालक मंडळाचा ठराव असेल, सभासदांच्या सर्वसाधारण सभेचा ठराव असेल या गोष्टी गरजेचे आहेत. सरकारची सहमती असेल या सर्व गोष्टी गरजेच्या असताना अशा पद्धतीची काही प्रक्रिया राबवली आहे का? याबाबतचा खुलासा करावा.
५) सभासदांनी मोठ्या विश्वासाने आपल्याला ही संस्था चालवण्यासाठी आपली निवड केली याचा अर्थ या संस्थेच भाडेतत्त्वावरती देणं, विक्री करणं हे अधिकार आपल्याला दिलेले नाहीत.
६)संस्था व्यवस्थितपणे चालवाल या अपेक्षने आपल्याकडे जबाबदारी दिलेली आहे. आपल्याला जर ही जबाबदारी पेलवणार नसेल किंवा आपण जर सक्षम नाही असे तुम्हालाच वाटायला लागले असेल तर आमचे पहिल्यापासूनच मत आहे की कल्याणराव काळे हे कारखाना चालवण्यासाठी सक्षम नाहीत कारण त्यांनी स्वतः चा असणारा सिताराम कारखाना जर २०२१ ला विक्री केला असेल तर ही संस्था कशा पद्धतीने चालवतील म्हणून जर ते सक्षम नसतील, पात्र नसतील तर त्यांनी कारखाना चालवावाच म्हणून कोणाची जबरदस्ती नाही त्यांनी राजीनामा द्यावा, संचालक मंडळाने राजीनामा द्यावा, पायउतार व्हावं. १० हजार पेक्षा जास्त सभासद आहेत. अनामत रकमा असणारी १० हजार इतर लोक आहेत ही सर्व २० हजार कुटुंबाची मिळून बनलेली संस्था आहे. त्यापैकी कोणीतरी पुढे येऊन ही संस्था निश्चितच चांगल्या पद्धतीने चालवू शकते. तुम्हाला चालवता येत नाही याचा अर्थ या २० हजार लोकांना ही चालवता येत नाही असा अर्थ होत नाही. गेली २५ वर्ष तुम्हाला सभासदांनी संधी दिलेली आहे तर आता जर आपल्याला ही जबाबदारी पेलवणार नसेल तर प्रामाणिकपणे मान्य करा आणि सर्व संचालक मंडळ व तुम्ही चेअरमन म्हणून राजीनामे देऊन बाजूला व्हा संस्था चालवायला सभासद खंबीर आहेत.
७) मागील वर्षीचं ऊस बिल थकीत आहे, कामगारांचे पगार थकित आहेत, कामगारांच्या फंडाच्या रकमा थकीत आहेत, तोडणी वाहतूकदारांची बिल थकीत आहेत. मग १४६ कोटी रुपये महाराष्ट्र शासनाने मागच्या वर्षी यांना दिले.१.५ लाख टनाचे मागील वर्षी गाळप झालं त्या गाळपातून जी साखर व उपपदार्थ तयार झाले, बग्यास, मोलेसिस तयार झाले या सगळ्याचा जर हिशोब केला तर हे सर्व पैसे जातायत तरी कुठे?
८) गेल्या ५-७ वर्षापासून बघतोय की सरळ पुढच्या वर्षीचा कारखाना सुरू करण्यापूर्वी दिले जातात. ज्या वेळेस तुम्ही शासनाचे थकहमीचे कर्ज घेतलं ते कर्ज हे या लोकांची देणी भागवण्यासाठी म्हणून घेतले होते पैसे आले आणि पैसे संपले ही या लोकांची देणे हे आहे असेच आहे मग नेमके ते पैसे गेले कुठे?याचा देखील खुलासा त्यांनी करावा. कर्ज मागणी ज्या कामासाठी केली होती त्याच कामासाठी वापरणे बंधनकारक आहे. पैसे तर संपलेत मग ते पैसे त्यांनी कुठे खर्च केलेत याबाबत त्यांनी आम्हाला स्पष्टपणे उलगडा करून सांगावा.
९) पुढील सन २०२५/२६ हंगामासाठी केवळ दोन महिने शिल्लक आहेत. दोन महिने शिल्लक असताना आपल्याकडे कोणतेही कामकाज झालेले दिसतनाही. संस्थेमधील आतील इंजिनिअरिंग वर्क झालेलं दिसत नाही किंवा कारखान्यामध्ये तोडणी वाहतूक यंत्रणेचा विषय मार्गी लागलेला दिसत नाही. मग अशा पद्धतीने तुम्ही कारखाना चालू करणार आहात का? चालवायचा आहे का? सभासदांनी त्यांच्या ऊसाची काय सोय लावायची याबाबत देखील त्यांनी स्पष्टपणे स्वतंत्रपणे खुलासा करावा.
१०) गेल्या पाच वर्षांमध्ये त्यातीलही २०२३ मधील १४६.३२ कोटी ,२०२१ ला १८ कोटी ,२०२० ला १४.५ कोटी केवळ शासनाच्या थकहमीवर यांनी १७८.८४ कोटी रुपये यांनी सरकार कडून घेतले ते सोडून यांनी इतर बँकांच्या, पतसंस्थेच्या वेगवेगळ्या बँकांचे कर्ज घेतले ते १०० हून अधिक कोटींचे वेगळेच आहे. सन २०२० पासून ते २०२५ पर्यंत गाळप काढले तर १३.५ लाख टनाचे गाळप झालेले आहे त्या सगळ्याचा जर हिशोब केला तर त्या गाळपापासून तयार झालेली साखर, मोलाशिस, बगॅस, वीज, डिस्टलरी या सगळ्यांची जर किंमत बघितली तर जवळपास ६२५ कोटी रुपये रक्कम ही साखर व उपपदार्थांची होते सरकारकडून थकहमी वर १८० कोटी व इतर बँकाकडून १०० कोटी असे २८० कोटी असे एकूण जवळपास ९०० कोटी रुपये या संस्थेमध्ये गेल्या ५ वर्षांमध्ये आलेले आहेत तरीदेखील ही संस्था अडचणीत आहे असे सांगून चालवायला देताय या ९०० कोटींचा हिशोब त्यांनी सर्व जनतेसमोर मांडला पाहिजे.
११) ही सर्व रक्कम कुठे गेली सगळ्यांची देणी तर अपुरीची दिसतात आणि रक्कम पैसे येत आहेत आणि हे पैसे जात आहेत कुठे याचा खुलासा कल्याणराव काळे यांनी केला पाहिजे.
१२) ही संस्था ही स्वर्गीय वसंतदादा काळे, आमचे वडील दामू आण्णा पवार, बाळासाहेब देशमुख , गोरख ताड, बाळासाहेब कौलगे व इतर अनेक सर्वच मान्यवर लोकांनी सभासदांच्या भल्यासाठी म्हणून या संस्थेसाठी १४ ते १५ वर्षांचा वनवास भोगून ही संस्था उभा केलेली आहे. ही संस्था उभी करत असताना सभासदांच्या कल्याणासाठी उभी केलेली आहे. तुमच्या स्वत:च्या कल्याणासाठी उभी केलेली नाही तरीदेखील गेली २५ वर्षे झाले तुम्ही स्वत:च्या कल्याणासाठी ही संस्था वापरलेली आहे आता जर तुमचे पोट भरले असेल तर आपण यातून या संस्थेला आपल्या जोखडातून मुक्त करावे आणि राजीनामा देऊन आपण बाजूला व्हावे.
१३) विनाकारण पुढची १० ते २० वर्ष चालवायला द्यायचा ठेका ही तुम्ही घेऊन हे मोठे पाप तुम्ही तुमच्या माथी मारून घेऊ नये अशी विनंती या निमित्ताने मी कल्याणराव काळे यांना करत आहे.
१४) मी सर्व सभासद, चालू संचालक, आज पर्यंत संस्थेत झालेले आजी माजी संचालक, शेतकरी बांधव, कामगार वर्ग सर्वांना हात जोडून विनंती करणार आहे ही संस्था वाचवली पाहिजे ही संस्था तुमच्या, माझ्या प्रपंचासाठी खूप गरजेची असणारी संस्था आहे.
१५) आपल्या पूर्वजांनी ही संस्था उभी केली आणि ही संस्था कोणीतरी एक माणूस स्वत:च्या स्वार्थासाठी जर वेठीस धरणार असेल भाड्याने देणार असेल किंवा विकणार असेल तर तुम्ही आम्ही आता शांत बसून चालणार नाही भले तुम्ही कल्याणराव काळे यांचे समर्थक असाल किंवा विरोधक असाल आपण आता ही वेळ गट-तट, पार्टी बघण्याची नाही तर ही संस्था वाचविण्याची वेळ आहे म्हणून आपल्या सर्वांना मी हात जोडून विनंती करतो सर्व सभासद, चालू संचालक, आज पर्यंत संस्थेत झालेले आजी माजी संचालक, शेतकरी बांधव, कामगार वर्ग व सर्वांनाच मी आवाहन करतो की, ही संस्था वाचवण्यासाठी आपण एकत्र यावे किंवा एकजूट व्हावे व्हावे व अपात्र अशा चेअरमनला व संचालक मंडळाला या संस्थेतून हद्दपार करावे असे आवाहन मी या निमित्ताने करतो.
