खेडभोसे गावातील दारूबंदीसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचा पुढाकारखेड भोसे
खेडभोसे गावातील दारूबंदीसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचा पुढाकार
खेड भोसे
पंढरपूर तालुक्यातील खेडभोसे येथे होणारी अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी आता राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुढाकार घेतला असून या विभागाच्या अधिकाऱ्यांनी खेडभोसे गावात भेट देऊन गावातील सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावून गावात कडक दारूबंदी करणार असल्याचे सांगितले. त्याचवेळी दारू विक्री करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करणार असल्याचाही इशारा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक पंकज कुंभार यांनी दिला.
श्री. कुंभार यांनी नुकतीच खेडभोसे गावाला भेट दिली. यावेळी सरपंच प्रतिनिधी संजय देवळे, उपसरपंच प्रतिनिधी अजित साळुंखे, ग्रामपंचायत सदस्य अशोक पवार, संतोष पवार, विकास पवार, सागर क्षीरसागर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बंडू पवार, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक कालिदास साळुंखे, पोलीस पाटील नंदिनी गवळी, माजी सरपंच विष्णू गवळी, पैलवान सत्यवान पवार विजय पवारसंजय माने उपस्थित होते.
खेडभोसे येथे खुलेआम अवैध दारू विक्री सुरू होती. याबाबत गावातील महिला, ग्रामस्थ यांनी ग्रामसभेमध्ये संपूर्ण दारूबंदी करण्याचा ठराव केला होता. या ठरावच्या प्रती करकंब पोलीस ठाणे, उपविभागीय पोलीस अधिकारी, पंढरपूर, तहसीलदार आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाला देण्यात आल्या होत्या. तरीसुद्धा गावात अवैध दारू विक्री सुरूच होती. या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पंढरपूर विभागीय अधिकाऱ्यांनी लक्ष घालून गावात दारूबंदी करण्यासाठी पावले उचलले आहेत. त्यानुसार खेडभोसे गावाला भेट देऊन गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची चर्चा केली.
यावेळी कायदा उल्लंघन करून जर कोणी अवैध दारू विक्री करत असेल तर त्याचा मुलाहिजा ठेवला जाणार नाही, त्यांच्यावर कडक कारवाई करू, असा सज्जड इशारा श्री. कुंभार यांनी दिला.
चौकट : जनहित शेतकरी संघटनेच्या प्रभाकर देशमुख यांनी घातले लक्ष
खेडभोसे येथे अवैध दारू विक्री थांबवण्यासाठी जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख यांनीही पुढाकार घेतला आहे. करकंब पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कुंजीर यांच्याशी फोनवरून चर्चा करून, गावात संपूर्ण दारूबंदी करण्यासाठी पोलिसांनी सहकार्य करावे, त्यांना जनहित शेतकरी संघटना आणि ग्रामस्थ उत्स्फूर्तपणे सहकार्य करतील. मात्र कुठल्याही परिस्थितीत गावात दारू विक्री बंद झालीच पाहिजे, अशी मागणी यांनी यावेळी केली.
