दारू बंदी करूनही गावात खुलेआम दारू विक्री आ. अभिजीत पाटील यांना ग्रामस्थांचे निवेदन
दारू बंदी करूनही गावात खुलेआम दारू विक्री
आ. अभिजीत पाटील यांना ग्रामस्थांचे निवेदन
भोसे
खेड भोसे
पंढरपूर तालुक्यातील खेडभोसे गावात संपूर्ण दारू बंदी करण्यात आली आहे, तरीसुद्धा गावात दारू विक्री सुरूच आहे, याबाबत आ. अभिजीत पाटील यांना हतबल झालेल्या खेडभोसे ग्रामस्थांनी निवेदन देऊन दारू बंदीची मागणी केली.
खेडभोसे गावात अवैध दारू विक्री सुरू होती, याबाबत ग्रामस्थांनी ग्रामसभेत ठराव करून संपूर्ण दारू विक्री बंद होण्यासाठी प्रशासनाने कडक धोरण घ्यावे, अशी मागणी केली. या दारू विक्री बंदीचा ठराव करकंब पोलीस ठाणे, राज्य उत्पादन शुल्क विभाग, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांना दिले होते.
तरीसुध्दा गावात अवैध दारू विक्री सुरूच होती. पोलीस प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे गावातील अनेक संसार उध्वस्त झाले आहेत, तरीसुद्धा पोलीस प्रशासनाकडून दारू विक्रेत्यांवर ठोस कारवाई केली जात नव्हती.
दरम्यान, खेडभोसे गावातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी आ. पाटील हे खेडभोसे येथे आले असताना त्यांना भेटून ग्रामस्थांनी हे निवेदन दिले.
यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य , विविध संस्थांचे पदाधिकारी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
चौकट :
याप्रकरणी आ. पाटील यांनी तत्काळ करकंब पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कुंजीर यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. आणि खेडभोसे गावातील अवैध दारू विक्री तात्काळ बंद करावी, अशी सूचना केली.
आ. पाटील यांच्या या सूचनेवर करकंब पोलिसांकडून कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
फोटो ओळी : खेडभोसे येथे आ. अभिजीत पाटील यांना दारू बंदीचे निवेदन देताना खेडभोसे ग्रामस्थ.