Thursday, November 27, 2025
Latest:
सोलापूर

मागील नगरपालिकेची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये अनगरकरांवर टीका करून निवडून आलात आणि पुन्हा त्यांच्याच चरणी नतमस्तक होऊन ‘ प्रथम झालात अडीच वर्ष खुर्चीची उब घेतली

Spread the love

मोहोळ /मोहोळ : मागील नगरपालिकेची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये अनगरकरांवर टीका करून निवडून आलात आणि पुन्हा त्यांच्याच चरणी नतमस्तक होऊन ' प्रथम ' झालात अडीच वर्ष खुर्चीची उब घेतली. अनेक विकास कामे मी केली असा कांगावा केला मोहोळचे तारणहार आपणच आहोत असा भासवण्याचा प्रयत्न केला आणि आत्ता या निवडणुकीमध्ये पुन्हा आम्ही विकास करू, आम्ही रस्ते करू ,आम्ही अमुक करू ,आम्ही तमुक करू अशा खोट्या वल्गना मारून व अनगरकरांवर टीका करून पुन्हा निवडून येण्यासाठी आपण केलेली तयारी मोहोळकर चांगलेच ओळखून आहेत. विकास कामे करायला तुम्हाला मोहोळकरांनी संधी दिली होती.आपण ती स्वहितासाठी वापरली त्यामुळे आता ती संधी मोहोळकर पुन्हा ' प्रथम ' ला देऊन चूक करणार नाहीत. असे परखड प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे युवा नेते सोमेश आबा क्षीरसागर यांनी केले. भारतीय जनता पार्टीच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शितल सुशील क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ भाजपा युवा नेते सोमेश क्षीरसागर यांनी मोहोळ शहरातील अनेक प्रभागात जाऊन तेथील नागरिकांची समक्ष भेट घेऊन त्या प्रभागातील समस्या जाणून घेतल्या त्या सोडवण्यासाठी काय उपाययोजना करावी लागेल ? याचीही माहिती त्यांनी घेतली तदनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.ते पुढे म्हणाले की, निवडणूक आली की कितीही नाही म्हटलं तरी टीकाटिप्पणी ही होतच असते मात्र एखाद्यावर टीका करताना त्या टीकेचा दर्जा राजकीय संस्कृतीला धरून असावा या संस्कारात मला माझे वडील भाजपाचे ज्येष्ठ नेते नागनाथ भाऊ क्षीरसागर यांनी वाढवलेले आहे. तर मोहोळ नगर परिषदेत माझा भाऊ सुशील क्षीरसागर यांनी नगरसेवक पदावर असताना अनेक विकास कामे केलेली आहेत.भाजपा च्या वरिष्ठ नेत्यांशी त्यांचे असलेले चांगले संबंध त्या माध्यमातून मोहोळ शहराच्या विकासासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात निधीही आणला आहे. आज त्यांच्या प्रभागांमध्ये मोठ्या प्रमाणात विकास झालेला जो दिसतो आहे. ते सर्व श्रेय हे सुशील क्षीरसागर यांचे प्रयत्न व भारतीय जनता पार्टी यांनी त्यांना दिलेली ताकद या दोघांचे आहे. आज लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी त्यांच्या पत्नी शितल क्षीरसागर यांना भारतीय जनता पार्टी यांनी उमेदवारी दिलेली आहे.मोहोळ तालुक्यातील भारतीय जनता पार्टी ही माजी आमदार राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करते आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच मोहोळ नगर परिषदेवर भारतीय जनता पार्टी चा नगराध्यक्ष नक्कीच होईल आणि त्याचबरोबर सर्वच्या सर्व नगरसेवक मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा माझा आत्मविश्वास आहे. मोहोळ नगर परिषदेच्या ' प्रथम ' राजकीय प्रस्थापिताने मोहोळ शहरात केलेल्या रस्त्याची कामे केलेल्या गटारीची कामे ही कशा पद्धतीने व कशा दर्जाची झालेले आहेत हे सर्वांनाच ज्ञात आहे. असे असतानाही आज ते लोकांची मते मिळवण्यासाठी भुलभुलय्या करून खोटी आश्वासने देणे यात मग्न आहेत.मी भाजपाचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मोहोळ नगर परिषदेमध्ये चाललेली ठेकेदारी ,भ्रष्ट कारभार हा भविष्यात होऊ देणार नाही. एक जागरूक मोहोळकर म्हणून मी कायमच लक्ष ठेवून राहीन, त्यामुळे अशा प्रथम भुलभुलय्यांना न फसता त्यांच्या आमिषाला बळी न पडता मोहोळकरांनी भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे. भारतीय जनता पार्टी शिवाय मोहोळ शहराचा विकास होऊ शकत नाही. असेही शेवटी सोमेश क्षीरसागर म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *