युवा प्रशिक्षणार्थीना हक्काची भाकरी द्या अन्यथा एक ऑगस्टला कृष्णामाईच्या घाटावर आमरण उपोषण★ तुकाराम बाबांचा इशारा; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांवर गुन्हे दाखल करा
युवा प्रशिक्षणार्थीना हक्काची भाकरी द्या अन्यथा एक ऑगस्टला कृष्णामाईच्या घाटावर आमरण उपोषण
★ तुकाराम बाबांचा इशारा; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांवर गुन्हे दाखल करा
सांगली/प्रतिनिधी:- सत्तेत आलेल्या महायुतीच्या सरकारने राज्यातील एक लाख ३४ हजार मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थीना वाऱ्यावर सोडले आहे. आज त्यांच्या हाताला काम नाही, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली असताना पोलीस प्रशासनाला हाताशी धरून आंदोलन दडपले जात आहे. घोषणा केलेले राज्यातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व त्या खात्याचे मंत्री युवा प्रशिक्षणार्थीच्या भावनेशी खेळत आहेत. निवडणुकीपूर्वी रोजगार दिला व आता त्यावर बोलायला तयार नाहीत. युवा प्रशिक्षणार्थीना या मंडळींनी फसवले आहे त्यांच्यावर ४२० चा फौजदारी गुन्हा दाखल करा.युवा प्रशिक्षणार्थीना हक्काची भाकरी द्या अन्यथा येत्या एक ऑगस्टला कृष्णामाईच्या घाटावर आमरण उपोषण करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य युवा प्रशिक्षणार्थी कृती समितीचे पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख तथा श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा, चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती हभप तुकाराम बाबा महाराज यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिला.
राज्यभरातील एक लाख ३४ हजार मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी यांची सहा महिन्यासाठी नियुक्ती करण्यात आली होती. सहा महिन्यांनंतर त्यांना घरी बसावे लागत होते. हभप तुकाराम बाबा महाराज यांनी युवा प्रशिक्षणार्थी संघटनेच्या खांद्याला खांदा लावून लढा उभा केला. मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन केले, सांगलीत थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी देहू ते मुंबई पायीदिंडी काढली. या आंदोलनाची अखेर शासनाने दखल घेत पाच महिन्यांची मुदत वाढ जाहीर केली. पुढील महिन्यात मुदत संपणार असल्याने हभप तुकाराम बाबा महाराज यांनी संपूर्ण राज्यातील ३६ जिल्ह्याचा संवाद दौरा करत युवा प्रशिक्षणार्थीशी संवाद साधला त्यानंतर १४ जुलैला मुंबई आझाद मैदानावर आंदोलन करत थेट विधानभवनावर छत्री मोर्चाचे आयोजन केले होते.
या आंदोलनासंदर्भात बोलताना हभप तुकाराम बाबा महाराज म्हणाले, मुंबईत काढलेल्या विराट छत्री मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला पण त्याची दखल शासनाने घेतली नाही उलट आम्ही असे बोललोच नाही म्हणत त्यांनी जबाबदारी झटकून देण्यास सुरुवात केली आहे. सभागृहातही सत्ताधारी मंडळी खोटे बोलत आहे. आझाद मैदानावरील आंदोलन दडपण्याचा, दिशाभूल करण्याचा प्रयत्न पोलीसांची दंडेलशाही वापरून करण्यात आला. आमच्या मागण्याची दखल घेतलेली नाही. उलट आम्हाला आझाद मैदानातून बाहेर काढले. आम्ही बाहेर आल्यानंतर सुद्धा पोलिसांनी आमच्याशी दगाबाजी करत मोर्चेकरांना पांगवले. आवाज दाबण्याचा हा प्रयत्न आहे.
निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांचा सत्तेत आल्यानंतर या मंडळींना विसर पडला आहे. युवा प्रशिक्षणार्थीची अवस्था बिकट आहे. त्यांची आहे त्या जागेवर वेतनावर नियुक्ती करावी ही आपली प्रामुख्याने मागणी आहे. मागणी मान्य न केल्यास राज्यभरातील ३६ जिल्ह्यातील युवा प्रशिक्षणार्थी यांना सोबत घेत सांगलीत श्री गणेशाचे दर्शन घेत कृष्णा माईच्या घाटावर आमरण उपोषण सुरू करणार असल्याचे हभप तुकाराम बाबा महाराज यांनी सांगितले.